महाराजांनी भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचे केले आवाहन; पंचक्रोशीतील भजन मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
राजोली : धानोरा तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजोली येथे १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्त श्री गुरुदेव दत्त भजन मंडळाच्या वतीने भव्य भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात पंचक्रोशीतील महिला, पुरुष तसेच बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घेतला. विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या कार्यक्रमाला रामनगर, गडचिरोली येथील अनुरथजी निलेकार महाराज, निमगाव (रांगी) येथील देवरावजी मोंगकर महाराज, मुरमाडी येथील मोरेश्वरजी आवारी महाराज आणि राजोली येथील केवटरामजी जेंगठे महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी अनुरथजी निलेकार महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. व्यसन हे केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात भक्तीची कास धरून व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या भजन संमेलनात पंचक्रोशीतील श्री दत्तगुरू भजन मंडळ, मुरमाडी; अष्टविनायक भजन मंडळ, मेंढाटोला; गुरुकृपा भजन मंडळ, धुंडेशिवणी; जानकी माता भजन मंडळ, कटेझरी; हिरासुका भजन मंडळ, तुकूम; श्री गुरुदेव दत्त भजन मंडळ, राजोली आणि श्री गुरुदेव भजन मंडळ, धानोरा यांसह विविध भजन मंडळांनी सहभाग नोंदविला.
भजन मंडळांनी एकापेक्षा एक सुंदर भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भजनांच्या तालावर रंगलेल्या या सोहळ्यात लहान मुलांसह सर्वच भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम या संमेलनातून अनुभवायला मिळाला.
यावेळी सहभागी भजन मंडळांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मनोहर गुरनुले यांनी मानले.


0 Comments