बनावट कागदपत्रे सादर करून वाळू उत्खनन ; सुरज हजारे यांची पत्रकार परिषदेतून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील करपडा चक येथील सर्व्हे क्रमांक १५७ मध्ये झालेल्या वाळू उत्खनन प्रकरणात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत वाळू भ्रष्टाचाराचा भंडाफोड करण्यात आला. या संदर्भात आज आयोजित गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते सुरज हजारे यांनी गंभीर आरोप करत संबंधित अधिकारी व वाळू माफियांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मौजा करपडा चक (ता. आरमोरी) येथील सर्व्हे क्र. १५७ मधील खातेधारक राजाराम पांडुरंग गेडाम उर्फ राजमशहा गेडाम यांचे १९ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले असतानाही त्यांना १९ मे २०२५ रोजी पोटहिस्सा मोजणीच्या वेळी उपस्थित दाखवून या सर्व्हे क्रमांकाचे दोन हिस्से करण्यात आले. हा प्रकार वाळू उत्खननाला परवानगी मिळवून देण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्रकरणात ग्रामसभेचा बनावट नाहरकत दाखला सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. पेसा क्षेत्र असल्याने वाळू निष्कासनासाठी ग्रामसभेचा नाहरकत दाखला आवश्यक असताना वाळू माफियांनी बाहेरून बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यावर सरपंचांची सही घेऊन सादर केल्याचे सांगण्यात आले. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीकडे असा कोणताही दस्तऐवज उपलब्ध नसून त्या संदर्भात ग्रामसभा देखील झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय विविध विभागांच्या समिती सदस्यांनीही चुकीचे अहवाल सादर केल्याचा आरोप करण्यात आला. भूमी अभिलेख विभागाने त्या क्षेत्रात वाळू असल्याचा अहवाल दिला असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समितीने पाहणी केली असता त्या ठिकाणी भुईमुगाच्या पिकाची लागवड असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले. तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याची खोली व निरीक्षणासंबंधी चुकीची माहिती देत इतर ठिकाणची छायाचित्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला. कृषी व पाटबंधारे विभागानेही त्या क्षेत्रात पीक घेता येत नसल्याचा चुकीचा अहवाल दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणे, चुकीचे अहवाल सादर करणे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सुरज हजारे,शंकर ढोलगे व रवि सेलोटे यांनी केली.

Post a Comment

0 Comments