सर्च चातगाव : सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च (सर्च) संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ सेवा देणारे, 'मुक्तीपथ'चे आरोग्य शिक्षक प्रभाकरराव केळझरकर ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या विशेष कार्यक्रमात 'सर्च'चे संस्थापक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या हस्ते प्रभाकरराव केळझरकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. केळझरकर यांनी सन १९८८ पासून ते ३१ मार्च २०२६ पर्यंत, म्हणजेच तब्बल ३८ वर्षे संस्थेच्या विविध महत्त्वाच्या पदांवर राहून समाजसेवेचे कार्य केले.
केळझरकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रामुख्याने व्यसनमुक्तीसाठी असलेल्या 'मुक्तीपथ' मोहिमेत आरोग्य शिक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली. तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य आणि व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. संस्थेने केलेल्या या आदराबद्दल बोलताना प्रभाकरराव यांनी कृतज्ञता व्यक्त केली व "या संस्थेत काम करणे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रवास होता," अशा भावना व्यक्त केल्या.


0 Comments