गडचिरोली : उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूची तस्करी व अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरातील विविध मार्गांसह प्रभागांमध्ये छापेमारी करून सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. रविवारी पोलिसांनी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत दारूसह वाहन असा एकूण 9 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमध्ये एका अल्पवयीनासह दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
गोकुळनगरात दारूने भरलेली कार जप्त
पहिली कारवाई गोकुळनगर परिसरात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातून कारच्या माध्यमातून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकात सापळा रचला.
यावेळी संशयास्पदरीत्या एक कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने कार न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता चालक गोकुळनगर परिसरात कार सोडून पसार झाला.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपये किमतीची दारू आणि 6 लाख रुपये किमतीची एमएच-34 एएन-6664 क्रमांकाची कार, असा एकूण 8 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोकुळनगर येथील आदिनाथ ऊर्फ आदित्य शेंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
दुचाकीवरून दारूची तस्करी; एकाला अटक
दुसरी कारवाई पोलीस ठाणे परिसरात करण्यात आली. दुचाकीवरून दारूची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत दुचाकीसह 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धानोरा तालुक्यातील चिचोली येथील श्रीकदम प्रल्हाद निकुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालय चौकात अल्पवयीन तस्करावर कारवाई
तिसरी कारवाई न्यायालय चौक परिसरात करण्यात आली. येथे एका अल्पवयीनाकडून दारूची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करत दुचाकीसह 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या तिन्ही कारवाया ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते, बंडू कोसरे, मुकेश बिके, शंकर पुंगाटी, प्रशांत हेडाऊ आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केल्या.


0 Comments