सात जणांवर हल्ला; गंभीर जखमींवर गडचिरोलीत उपचार सुरू
चामोर्शी, : तालुक्यातील मुरखळाचक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत तब्बल सात जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात विलास रामदास रोहनकर (५२), धनराज रोहनकर (७८), पत्रुजी किसन घोडे (६५), मयूर गिरीधर शेंद्रे (२४), ध्रुव तुकाराम ठेमसकर (५४), शामराव बालाजी कुणघाटकर (५५) आणि शिलाबाई डोमु गोवर्धन (४०) हे सातही जण जखमी झाले. सर्व जखमी मुरखळाचक येथील रहिवासी आहेत.
कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक करमणकर यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. तसेच सर्व जखमींना अँटी-रेबीज लस देण्यात आली.
मात्र, ग्रामीण रुग्णालयात रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (सिरम) उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी सातही जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आवश्यक सिरम उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गडचिरोली येथे रेफर करावे लागत असल्याची माहिती डॉ. मयंक करमणकर यांनी दिली.
आरोग्य सुविधांवर नागरिकांचा सवाल
चामोर्शी हा जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आरोग्यसेवेसाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असलेले सिरम उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यासारख्या तातडीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी गडचिरोलीपर्यंत धाव घ्यावी लागू नये, यासाठी आरोग्य विभागाने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात अँटी-रेबीज लसीसोबत आवश्यक सिरमचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मुरखळाचक परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.


0 Comments