प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उद्ध्वस्त


चार आरोपी अटकेत; २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी फरार
गडचिरोली  : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे अवैध उत्पादन व साठवणूक करणाऱ्या टोळीविरोधात गट्टा (फु.) पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, सुगंधित तंबाखू, उत्पादन व पॅकिंगचे साहित्य तसेच महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रशांत याडवार हा आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

दिनांक १८ सप्टेंबर रोजी गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्राच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अजीत जोहन कुजूर हा जांभळीझोरा, ता. धानोरा येथील आपल्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करीत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घराची व परिसराची पाहणी केली. यावेळी घरात सुगंधित तंबाखूचा मोठा साठा तसेच पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य आढळून आले.

त्यानंतर घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील सीटखाली दोन पिवळ्या व दोन पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमध्ये सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी घर व वाहनातून १०३ पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमधील सुगंधित तंबाखूची किंमत १२ लाख ५ हजार ३८० रुपये, तसेच दोन पांढऱ्या व दोन पिवळ्या रंगाच्या चुंगळ्यांमधील तंबाखूची ३ लाख ५ हजार १०० रुपये किंमतीचा साठा जप्त केला.

याशिवाय ‘मजा १०८ हुक्का शिसा तंबाखू’ असे नमूद असलेली १० पॉलीथीन पॅकेट्स, पॅकिंगसाठी वापरले जाणारे बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटिक फिल्म सीलिंग मशीन, पोर्टेबल बॅग शिलाई मशीन, स्ट्रेटनर मशीन असा सुमारे १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा उत्पादन साहित्याचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे ६ लाख रुपये किंमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच ३३ एसी ५१७०) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली.

चौकशीत अजीत कुजूर याने सदर मुद्देमाल प्रशांत याडवार याचा असल्याचे सांगितले. तसेच साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे हे त्याचे साथीदार असल्याची माहिती दिली.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्रात पाच आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अजीत जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे या चार आरोपींना २० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. फरार आरोपी प्रशांत याडवार याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे व गट्टा (फु.) पोलीस पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments