अलापल्ली : अलापल्ली येथे आयोजित बेलव्ड राजा गणेश जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुरुषांच्या 5 किलोमीटर आणि महिलांच्या 3 किलोमीटर खुल्या गटात अकादमीच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावला.
अलापल्ली बेलव्ड राजा गणेश मंडळाच्या वतीने या जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणांहून खेळाडूंनी सहभाग घेतला.
पुरुषांच्या खुल्या 5 किलोमीटर गटात लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचा खेळाडू यश बुधाकर याने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक मिळविले. त्याने उत्कृष्ट सहनशक्ती आणि स्पर्धात्मक क्षमतेचे प्रदर्शन केले. महिलांच्या 3 किलोमीटर गटात मोनिका सानू मडावी हिनेही द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.
या दोन्ही खेळाडूंच्या यशामागे सातत्यपूर्ण सराव, मेहनत, शिस्त आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये असलेली क्रीडा प्रतिभा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी समाधान व्यक्त केले. दुर्गम भागात विकसित करण्यात आलेल्या क्रीडा सुविधांमुळे स्थानिक युवकांना प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. यश बुधाकर, मोनिका मडावी, त्यांचे प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणाशी संबंधित सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीकडूनही दोन्ही खेळाडूंच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करण्यात आले. या कामगिरीमुळे अकादमीतील इतर युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीकडून युवा क्रीडा प्रतिभांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.


0 Comments