घोट, अवैध सागवान वाहतुकीविरुद्ध घोट वनपरिक्षेत्राच्या पथकाने धडक कारवाई करत दहा सागवान नगांसह चारचाकी वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण 3 लाख 3 हजार 914 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना वन कोठडी सुनावली आहे.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ सुब्रत अधिकारी (वय २५, रा. घोट) आणि अजय शंकर रॉय (वय २०, रा. घोट) यांना अवैध सागवान वाहतूक प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सागवानाचे दहा नग जप्त करण्यात आले. या लाकडाचे एकूण घनफळ ०.४५८ घनमीटर असून त्याची किंमत ५३ हजार ९१४ रुपये आहे.
सागवानाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले MH 31 CN 2715 क्रमांकाचे चारचाकी वाहनही वन विभागाने जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. लाकूड व वाहन असा एकूण ३ लाख ३ हजार ९१४ रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१)(ई), ४१, ४२, ५२ व ५५ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना वन कोठडी सुनावली.
वन विभागाची कारवाई तीव्र
घोट परिसरात सागवानाची अवैध तोड, साठवणूक व वाहतुकीवर वन विभागाने लक्ष केंद्रित केले असून, वनसंपत्तीची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अल्लापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना व सहाय्यक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली, घोट वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत क्षेत्र सहायक एस. एन. राठोड यांच्यासह घोट वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार आणि क्षेत्र सहायक एस. एन. राठोड करीत आहेत.


0 Comments