धानोरा :
शेतात नांगरणीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर नदीच्या दिशेने जाऊन पलटी झाल्याने एका ४६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील कटाणी नदीशेजारी घडली. शत्रुघ्न विश्वनाथ सोनुले (वय ४६, रा. धानोरा) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शत्रुघ्न सोनुले यांचे शेत धानोरा मुख्यालयापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर कटाणी नदीशेजारी, राजोली-सालेभट्टी परिसरात आहे. सध्या शेतकरी भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करीत आहेत. त्यानुसार शेतात नांगरणीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
ट्रॅक्टर चालक काही वेळासाठी पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता. यावेळी शत्रुघ्न सोनुले यांनी काही वेळ ट्रॅक्टर चालविण्याची इच्छा व्यक्त केली. ते ट्रॅक्टर चालवत असताना नदीलगतच्या शेताच्या भागात ट्रॅक्टर गेल्याने अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर नदीच्या दिशेने पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत शत्रुघ्न सोनुले यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत शत्रुघ्न सोनुले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेमुळे सोनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.


0 Comments