गडचिरोली : जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पीक असलेल्या १,५७२ गावांची हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन करून जिल्ह्याची हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १,६८८ गावे असून, त्यापैकी १,६२२ गावे खरीप पिकांची आहेत. या खरीप गावांपैकी ५० गावांमध्ये यंदा पीक नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उर्वरित १,५७२ गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
हंगामी पैसेवारी ही पिकांची अपेक्षित उत्पादनस्थिती दर्शविणारा महत्त्वाचा प्राथमिक अंदाज मानला जातो. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील जाहीर करण्यात आलेल्या सर्व गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याने खरीप पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोनतृतीयांश क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झालेली चार रब्बी गावे देखील आहेत. संबंधित गावांची नोंदही पैसेवारी प्रक्रियेत करण्यात आली आहे.


0 Comments