गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोहका गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन दोघांकडील 80 लिटर मोहफुलाचा सडवा व दोन लिटर दारू नष्ट केली आहे. सोबतच एका विक्रेत्याकडून 5 हजार दंडही वसूल करण्यात आला आहे.
कोहका गावात गेल्या काही वर्षांपूर्वी दारूविक्री बंद होती. मात्र, काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने विक्री करण्यास सुरु केली होती. गावातील दारूविक्री पुन्हा बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले. यात गावात दारूविक्री करणाऱ्यांवर 10 हजार रुपये दंड, विक्रेत्याची माहिती देणाऱ्या बक्षीस, गावात दारू पिऊन भांडण करणाऱ्यांवर 5 हजारांचा दंड वसूल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गावातील 5 दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी केली असता, एका घरी 80 किलो मोहफुलाचा सडवा व एकाकडे दोन लिटर दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच पुन्हा दारूविक्री करतांना निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचेही ठणकावून सांगण्यात आले. यावेळी गाव संघटनेचे पदाधिकारी, तंमुस अध्यक्ष व गावकरी उपस्थित होतेे.
0 Comments