लॉयड्स तर्फे जीडीपीएल 2026 टी–20 सीझनची घोषणा : जिल्हा प्रेक्षागार मैदानावर महिला क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश

जिल्हा प्रेक्षागार मैदानावर महिला क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) च्या २०२६ टी–20 सीझनचे नियम, स्वरूप आणि कार्यक्रम आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. आगामी सीझनचची सुरुवात १६ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणाऱ्या पात्रता फेऱ्यांपासून होणार असून, जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतू संस्थेने व्यक्त केला आहे.

२0 संघांची दमदार स्पर्धा: एकूण २0 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये १२ तालुका संघ आणि ८ विभागीय संघ — लॉयड्स, कलेक्टर्स इलेव्हन (जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व विभाग), पोलीस, CRPF, जिल्हा परिषद (कृषी विभागासह), गोंडवाना विद्यापीठ, वन विभाग आणि मीडिया संघ — यांचा समावेश आहे. सर्व सामने IPL व BCCI मानक T20 नियमांनुसार खेळवले जातील.

स्पर्धेची रचना

GDPL २०२६ सीझनसाठी संघ निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्पर्धात्मक करण्यात आली आहे. मागील सीझनमधील क्रमवारीनुसार ८ संघांना थेट पात्रता देण्यात आली आहे. उर्वरित संघांपैकी १२ संघांमध्ये सिंगल-नॉकआऊट स्वरूपात सामने खेळवण्यात येणार असून, त्यातून ६ विजेते संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. याशिवाय, स्पर्धेला अधिक संधीप्रधान स्वरूप देण्यासाठी अतिरिक्त २ संघांची निवड लकी ड्रॉद्वारे करण्यात येईल. अशा प्रकारे एकूण १६ संघांची अंतिम यादी निश्चित होणार असून, हे संघ ४ गटांमध्ये विभागले जातील. गट-चरणानंतर स्पर्धेचे रोमांचक प्लेऑफ सामने आयोजित केले जातील.

संघ आणि खेळाडूंशी संबंधित नियमांमध्ये या वर्षी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात १६ खेळाडू आणि ४ अधिकृत सदस्य असणे अनिवार्य आहे. स्थानिक प्रतिभेमध्ये विविधता आणि दर्जा वाढावा यासाठी संघांना VCA–नागपूर झोन पात्रतेचे २ बाहेरील खेळाडू सामील करण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व खेळाडूंची नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे नियम

स्पर्धेच्या तांत्रिक नियमांनुसार, प्रत्येक सामन्यात २० षटकांची मर्यादा असेल, तर एका गोलंदाजाला कमाल ४ षटके टाकण्याची परवानगी असेल. पहिली ६ षटके पॉवर प्ले स्वरूपात खेळवली जातील. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे निकाल निश्चित केला जाईल. वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी २० षटके — ९० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची वेळमर्यादा लागू करण्यात आली आहे. गुण प्रणालीमध्ये विजयासाठी २ गुण, बरोबरी किंवा NR साठी १ गुण, तर पराभवासाठी ० गुण अशी तरतूद आहे.


प्रामाणिकपणा व सुरक्षेची हमी

GDPL २०२६ सीझनसाठी ड्रेस कोड, अनुशासन, वाहतूक व भोजन नियमांचे पालन अनिवार्य ठेवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी न्यूट्रल अंपायर, मॅच रिफरी तसेच टीम इंटेग्रिटी ऑफिसर्स नियुक्त करण्यात येत आहेत.

प्रत्येक मैदानावर खेळाडूंसाठी फर्स्ट-एड सुविधा उपलब्ध असणार असून, खेळाच्या शिस्तीचे पालन करण्याच्या दृष्टीने मैदानात मोबाईल फोन आणि कम्युनिकेशन डिव्हाइस वापरण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.

महिला क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश

या वर्षीच्या GDPL मध्ये महिला क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित होत असून, 4 महिला संघ दोन नॉकआऊट सामने आणि ग्रँड फायनल सामन्यात आपली क्षमता सिद्ध करणार आहेत.

GDPL २०२६ सीझनमुळे गडचिरोलीतील क्रिकेटला नवी दिशा मिळणार असून, अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक क्रिकेटिंग व्यासपीठ निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना अधिक संधी, उत्तम सुविधा आणि उच्च दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments