विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर

एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक


कोरची : विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे कोरची तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासीबहुल कोरची तालुक्यातील जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावरती मोर्चा काढून अनेक समस्यांचे निवेदन शासनाला सादर केले. 
माहे 2022 पासून घरभाड्याची रक्कम प्रलंबित आहे, रेणू रामदास बोगा यांच्या पदोन्नतीसाठी ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी, बोरी अंगणवाडी क्रमांक दोनमधील अर्चना योगेश साहारे यांना कामावर रुजू करा, टीएडीएचे पैसे तत्काळ देण्यात यावे, मानधनात वाढ करण्यात यावी, नवीन मोबाईल तातडीने द्यावा, दरमहा पेन्शन द्यावी, पोषण ट्रॅकर ऍप पूर्णपणे मराठीत द्यावे, प्रोत्साहन भत्ता सेविकेला 2000 रुपये व मदतनीसला 1 हजार रूपये द्यावा, सेविका, मदतनीस, सुपरवायझर व प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्ती द्यावी, अंगणवाडी इमारतींना केलेली भाडेकर विनाअट देण्यात यावी, प्रवास भत्ते, सीबी, साड्या, रिचार्जचे पैसे वाढवून वेळेवर देण्यात यावेत, पोषण अमृत आहार यांचे दर तिप्पट करा, मिनी अंगणवाडीस मदतनीस देऊन मोठ्या अंगणवाडी रूपांतर करा आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी प्रकल्प अधिकारी चिमूरकर यांना सादर करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध समस्यांचे निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवून तत्काळ समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
या आंदोलनात राज्य कार्याध्यक्षा किसन भानारकर, अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष माया ढाकणे, नागपूरचे सचिव उज्वला नारनवरे, ज्योतीगिता देशभ्रतार, विशाखा भोस्कर, कोरची तालुका संघटनेचे अध्यक्ष मंजुळा वाढई, उपाध्यक्ष मंदा नंदेश्वर, सचिव हिराबाई पडोटी, सदस्य वनिता कुमरे, ज्योती कोरेटी, अरूणा नंदेश्वर, कलाबाई सहारे, हेमलता सयाम, मंदा शेंडे, चंद्रकुमारी मानिकपूरी, पंचफुला उईके, बंसती अंबादे यांच्यासह तालुक्यातील विविध अंगणवाडीतील सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments