सुरजागड प्रकल्प ठरला नागरिकांसाठी जीवघेणा : माजी जि .प. अध्यक्ष अजय कंकडालवार
आष्टी -आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील खमणचेरु - सुभाषग्राम जवळ सुरजागड येथून खनिज वाहतूक करण्याकरिता आलेल्या जवळपास ४० वाहनांवर अहेरी पोलिसांकडून कलम २८३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, काल सायंकाळच्या सुमारास बहुचर्चित सुरजागड येथून खनिजाची वाहतूक करण्याकरिता आलेले ४० वाहने आष्टी-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील खमणचेरु - सुभाषग्राम जवळील रस्त्याच्या कडेला उभे करून होते. त्यामुळे आलापल्ली-आष्टी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती. आधीच खड्डेमय, अरुंद रस्ते त्यातला त्यात वाहने रस्त्यावर उभे करून ठेवल्याने त्या मार्गाने जाणारे नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने पुढे जातील कसे, असा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना काही नागरिकांनी माहिती दिली असता अजय कंकडालवार यांनी लगेच घटनास्थळ गाठून संबंधित प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दूरध्वनीद्वारे कळविले व कारवाईची मागणी केली असता अहेरीचे ठाणेदार किशोर मानभाव हे घटनास्थळ गाठून ४० वाहनांवर सार्वजनिक रस्त्यामधील धोका किंवा अटकाव करीत असल्याबाबत कलम २८३ अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या त्या संपूर्ण वाहनचालकांची कागदपत्री तपासणी व पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती अहेरीचे ठाणेदार किशोर मानभाव यांनी लोकप्रवाह न्युजशी बोलतांना दिली. याबाबत माजी जि .प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले कि, सुरजागड येथून वाहतुकीसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडे परवाना नसून वाहनांचेही कागदपत्रे अपुरे असतात आणि गुंड प्रवृत्तीचे लोक सदर प्रकल्पात गुंतले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. वाहनचालक रस्त्यावर येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांना साईड देत नाहीत. नागरिकांच्या अंगावर वाहने नेत असतात. यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांचा जीव गेला असून अश्या गंभीर समस्येकडे शासन - प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. संपूर्ण रस्त्यांची निर्मिती होईपर्यंत उत्खनन व वाहतूक बंद करावी, अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडणार असल्याचे सांगितलेे.
0 Comments