उत्तर गडचिरोली विभागात दोन जहाल नक्षल्यांना अटक lokpravah.com

10 लाखांचे होते बक्षिस



गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागात नक्षल चळवळ अधिक बळकट करण्यासाठी रेकी करीत असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या मोरचूल येथून अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. सनिराम ऊर्फ शंकर कृष्णा शामलाल नरोटे (24) व समुराम ऊर्फ सूर्या घसेन नरोटे (22) दोघेही रा. मोरचूल अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलींची नावे आहेत. शासनाने  या दोन्ही नक्षलींवर 10 लाखाचे बक्षिस जाहिर केले होते.  

सनिराम नरोटे हा 2015 मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन 2018 पर्यंत डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर 2020 पर्यंत तो कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. शासनाने त्याच्यावर 8 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. तर समुरा नरोटे हा जन मिलिशिया सदस्य असून शासनाने त्याचेवर 2 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यात सहभाग होता. अटकेतील दोन्ही नक्षलींची अधिक चौकशी केली असता वरिष्ठ नक्षली कॅडरच्या आदेशानुसार उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळ अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने दोघांसह अन्य काही जणांना रेकी करण्यासाठी उत्तर गडचिरोली पाठिवले होते, अशी माहिती मिळाली. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्याना अटक केल्याने विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात यश आले असल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. 

गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षल विरोधी अभियानामुळे ऑक्टोबर 2020 ते आतापर्यंत एकूण 16 नक्षलवाद्यांना अटक (66 लाखाचे बक्षिस) करण्यात आली, 19 नक्षल्यांचे आत्मसमर्पण (शासनाने जाहिर केलेले बक्षिस 1 कोटी 24 लाख रुपये), 55 नक्षल्यांना कंठस्नानत घालण्यात आले आहे. (शासनाने जाहिर केलेले एकूण बक्षीस 4 कोटी 10 लाख रुपये). सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात पार पडली. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवांयावर अंकुश लावण्यासाठी नक्षल विरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जगण्याचे आवाहन, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेला वरिष्ठ पोलिस अधिकारी सोमय मुंडे, अनुज तारे, समीर शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments