विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने सन २०२२ पासून सुरू केलेल्या “हर घर तिरंगा” या जनचळवळ मोहिमेला यावर्षीही गडचिरोली शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे व भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, सन २०२५ मध्ये २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी शहरात तिरंगा सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथून झाली. हातात तिरंगा घेऊन, देशभक्तीपर घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावरून निघालेली ही रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
रॅलीत नगर परिषदेचे कर्मचारी यांचेसह शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक, सायकल स्नेही मंडळ, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच मोठ्या संख्येने गडचिरोलीकर नागरिक सहभागी झाले. रॅलीचा समारोप एकता पार्क येथे झाला, जिथे सहभागींसाठी लघु देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments