गडचिरोली: दि. 23 सप्टेंबर 2025: पुणे येथे 15 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित 20व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने श्वान पथक स्पर्धेतील गुन्हे शोधक प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. या यशासह साराची नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील श्वान स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
महाराष्ट्रात वाढत्या शहरीकरणासोबतच गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दलाला सतत सज्ज राहावे लागते. याच उद्देशाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे पुणे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस कर्मचाऱ्यांचे कौशल्य, कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य हेतू होता. मेळाव्यात 25 विविध विभागांनी सहभाग नोंदवला होता.
या मेळाव्यात सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक आणि श्वान पथक अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून, तज्ञांमार्फत वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने गुन्हे शोधक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. ओमप्रकाश बोरेवार, श्वान सारा, श्वान हस्तक पोहवा/2134 राजेंद्र कौशिक आणि पोहवा/2314 अर्जुन परकीवार यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments