गडचिरोली : शहरात दरवर्षी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात नवरात्री उत्सव साजरा केला जातो. या पावन पर्वाला अधिक पवित्रता आणि सामाजिक ऐक्याची जोड मिळावी यासाठी यंदाही शहरातील सर्व मटण व चिकन मार्केट पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे नेतृत्व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी करत शहरवासीयांना धार्मिक सौहार्दाचा एक सुंदर संदेश दिला आहे.
मागील वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घटस्थापना पासून विजयादशमीपर्यंत मांस विक्री बंद ठेवण्यासाठी शहरातील सर्व मांस विक्रेत्यांनी – विशेषतः मुस्लिम बांधवांनी – एकमताने होकार दर्शविला. मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने सहकार्य देत हिंदू बांधवांसोबत सामाजिक बंधुभावाचे उदाहरण घालून दिले आहे.
या निर्णयाबाबत बोलताना उदय धकाते म्हणाले,
“नवरात्री हा शुद्धता, मातृशक्तीची उपासना आणि एकतेचा उत्सव आहे. या पावन काळात मांस विक्री बंद ठेवून आपण फक्त धार्मिक परंपरा जपत नाही, तर समाजात एकोपा आणि परस्पर आदराचे मूल्यही रुजवत आहोत. हिंदू-मुस्लिम सर्व बंधूंनी दिलेले सहकार्य हे गडचिरोलीच्या सौहार्दपूर्ण संस्कृतीचे खरे दर्शन आहे. यामुळे शहरातील कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत.”
दरम्यान, कारगिल चौकात दरवर्षीप्रमाणे दुर्गा देवींची स्थापना करून विधिवत पूजा-अर्चा सुरू आहे. महिला मंडळांच्या वतीने पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
शहरात कुठेही मांस विक्री सुरु असल्यास त्या भागातील दुर्गा व शारदा मंडळांनी दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन उदय धकाते यांनी केले आहे.
गडचिरोलीकरांच्या या उपक्रमाने नवरात्रीला धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला आहे.
0 Comments