"वाळूमाफियांच्या दबावाखाली प्रस्ताव मंजूर?"

 करपाडा चक रेती प्रकरणी एसडीओ कार्यालयासमोर सुरज हजारे यांचे  बेमुदत आंदोलन
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील करपाडा चक येथील सर्व्हे क्र. १५७/१ क्षेत्र ३.८८ हेक्टर जागेतून रेती निष्कासनास दिलेल्या मंजुरीने खळबळ उडाली असून, नियमबाह्य कारभार व अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप करत सुरज अशोक हजारे यांनी उपविभागीय अधिकारी, देसाईगंज कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सदर जमीन ही मृत खातेदारांच्या नावावरील सर्व्हे क्र. १५७ मधून नियमबाह्य पद्धतीने पोटहिस्सा करून ताब्यात घेण्यात आली असून, त्या ठिकाणी यापूर्वी भुईमूग पीक घेतले जात होते. असे असताना प्रत्यक्षात क्षेत्रात ३७ हजार ब्रास रेती नसतानाही भुजल सर्वे अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात भुमी अभिलेख विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वाळू असल्याचे नमूद केले, मात्र फेर सर्वेक्षणात कोणतीही स्पष्ट नोंद करण्यात आली नाही.

या प्रकरणात वाळूमाफिया व वर्गे यांच्या दबावाखाली गौण खनिज प्रकरणात यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले उपविभागीय अधिकारी प्रसनजीत प्रधान, नियमबाह्य पोटहिस्सा प्रकरणातील आरमोरी तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे. संपूर्ण चौकशी न करता व तक्रारकर्त्याला अंधारात ठेवून उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करावी व त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments