८ प्रवासी जखमी; ४ जणांची प्रकृती गंभीर
अहेरी : अहेरीवरून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील ८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
हा अपघात सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास लोकबिरादरी व प्राणहिता पोलीस कॅम्प दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी ऑटो (क्रमांक MH 33 W 0048) अहेरीहून आल्लापल्लीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की ऑटो रस्त्यावर उलटला. अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघातात ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख (वय ४१, रा. अहेरी) यांना छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासह तनवीरजा गफूर शेख (२८, अहेरी), हुसनबी सरवर शेख (६०, अहेरी), जमीला हसन शेख (४७),
ममता वेलादी (२५, रा. भंगारमपेठा), श्यामला येमुलवार (३९, अहेरी), शांता गडडमवार (६५, रा. कोत्तुर), मंगेश मेश्राम (३७, रा. नवेगाव), हे प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख, मंगेश मेश्राम आणि ममता वेलादी यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments